मुंबई : शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या (Shiv Sampark Abhiyan) कार्यक्रमाचं भव्य दिव्य असं आयोजन आज मुंबईत करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी गेल्या महिनाभरापासून शिवसेनेनं जोरदार तयारी केली होती. राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची ही खुल्या मैदानावरील पहिली जाहीर सभा आहे. शिवसेना सत्तेत आल्यापासून शिवसेनेवर झालेले आरोप प्रत्यारोप, केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया आणि विशेषत: हिंदुत्वाच्या मुद्दयावरुन शिवसेनेला (Shiv Sena) कोंडीत पकडण्याचे प्रयत्न भाजपकडून झाले. राणा, सोमय्या आणि नंतर राज ठाकरेंनीही शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या सर्व आरोपांना आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं.
भाषणाला सुरुवात करताच उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना वाटतंय की, तेच हिंदुत्वाचे कैवारी आहेत. मग समोर बसलेले कोण? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भाजपचं योगदाना काय? असा सवाल केला. काँग्रेससोबत आम्ही गेलो म्हणून तुम्ही आज बोलतायेत, मात्र तुम्ही तिकडे काश्मिरमध्ये मुफ्तींसोबत गेला होतात असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्याला आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. "सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम... अरे छट हा तर निघाला... आणखी एक ‘ #टोमणे बॉम्ब’... जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा!" असं म्हणत फडणवीसांनी उत्तर दिलं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना ते म्हणाले की, बाबरीला जर तुम्ही खरं गेला असता तर मशिदीवर चढतानाच तुमच्या ओझ्यानं मशिद पडली असती असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच बाबरी मशिद पाडण्यासाठी गेलेले लोक मराठी लोक होते. बाळासाहेब म्हणाले बाबरी पाडली असेल तर मला अभिमान आहे.