मुंबई : राज्यात सध्या शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. या मालिकेत सध्या थेट सभेतून उत्तर देण्याचा एपिसोड सुरु असून, काल उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) जाहीर सभेनंतर आज भाजपने त्यांना उत्तर दिलं आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुलावर झालेल्या मोठ्या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला होता. या कार्यक्रमात त्यांनी आशिष शेलार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता आज आशिष शेलार यांनी मुंबईतील गोरेगावमध्ये आयोजित हिंदी भाषिक महासंकल्प सभेतून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
आशिष शेलार म्हणाले, आपल्या घरात हनुमान चालिसा म्हणा, घराच्या बाहेर आणि शेजारच्याच्या घरात जाऊनही हनुमान चालिसा म्हणा असं आशिष शेलार म्हणाले. हनुमान चालिसा म्हणणाऱ्याला जेल आणि औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणारा अकबरुद्दी ओवैसी सही सलामत निघून जातो. हे सरकार कुणाचंय असा सवाल निर्माण होतो असं आशिष शेलार म्हणाले. तसंच कालची सभा म्हणजे थुकून चाटलेली सभा म्हणजेच 'थु-चाट' सभा होती असं आशिष शेलार म्हणाले.
राज्यात येणाऱ्या वेगवेगळ्या विकास कामांना शिवसेनेने विरोध केला. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरु झालेली अनेक कामं रखडलेली आहेत. मेट्रोचं काम सुद्धा रखडलेलं आहे. मुंबईचे मेट्रोमॅन हे दुसरं कुणी नसून फक्त देवेंद्र फडणवीसच आहे असं शेलार म्हणाले. मुंबई महानगरपालिकेने गटार सफाई, पेंग्विन अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमधून पैसे खाल्ले जात असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली. तसंच उंदरं मारण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचं आशिष शेलार म्हणाले.