एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्य सरकार अल्पमतात आलं होतं. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी उध्दव ठाकरे यांना बहूमताची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिलाय. याच दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना मार्गदर्शन करताना भाजपच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षांत सत्तेवर येणारे सरकार पुढील २५ वर्षे चालेल असे म्हटले आहे.
भाजपच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षांत सत्तेवर येणारे सरकार पुढील २५ वर्षे चालेल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना मार्गदर्शन करताना केले व एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. भाजपची पुढील रणनीती गुरुवारी सांगितली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत फडणवीस आणि शिवसेना बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे चर्चा करुन निर्णय घेतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले. उध्दव ठाकरे यांचा राजीनामा ही आनंद साजरा करण्याची गोष्ट नाही. त्यामुळे जल्लोष करताना आणि प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन पाटील यांनी केले.