सांगली जिल्ह्यातील गोवर्गीय जनावरांचे शंभर टक्के लसीकरण होऊनही लम्पीचा संसर्ग वाढत आहे . गेल्या पाच दिवसांत ५३२ जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला आहे. तर ३६ बाधित जनावरांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून गोवर्गीय जनावरांना लम्पीची लागण होत आहे. वाळवा तालुक्यातून या संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाला. हळूहळू तो जिल्हाभर पसरला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनावरांना लम्पीचा संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे.
या संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू होताच प्रशासनाने जनावरांचा आठवडे बाजार तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या जनावरांवर बंदी घातली. त्यानंतर ऊसतोडीसाठी टोळ्या येऊ लागल्याने लसीकरण झालेल्या जनावरांना परवानगी देण्यात आली, असे प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले. त्यासोबतच बाधित जनावरांपासून पाच किलोमीटरच्या परिघातील जनावरांचे लसीकरण सुरू केले.
त्यानंतर लसीकरण वाढवून सर्व गोवर्गीय जनावरांचे लसीकरण करून घेतले. लम्पीचा संसर्ग रोखण्यासाठी असे सगळे प्रयत्न सुरू असतात तरी त्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत निघाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर चिंता वाढली आहे. केवळ गेल्या पाच दिवसांत ५३२ जनावरांना झालेली बाधा हा याचा पुरावा आहे.