श्रद्धा वालकर हत्याकांडाने दिल्लीसह देशाला हादरवून टाकले असतानाच दिल्लीत आणखी एक हत्याकांडांची बातमी समोर येत आहे. दिल्लीतील पांडवनगरमध्ये एका महिलेने तिच्या मुलाच्या मदतीने पतीची हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी त्याचे दहा तुकडे करून ‘फ्रीज’मध्ये ठेवले.
पूनम दास असे पत्नीचे तर दीपक दास असे मुलाचे नाव आहे. पूनम दासने पतीला आधी नशेच्या गोळ्या खाऊ घातल्या, त्यानंतर मुलाच्या मदतीने त्याची हत्या केली. अंजन दास याचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध होते. यावरुन नेहमी घरात वाद होत असत. याच वादातून मायलेकांनी मिळून अंजन दासचा काटा काढला.
अंजन दास (४५ वर्षे) याची ३० मे रोजी हत्या करण्यात आली. त्याचा खून पत्नी पूनम (४८) व सावत्र मुलगा दीपक (२५) यांनी केला. अंजन दासच्या मृतदेहाचे काही अवशेष एका पिशवीत भरलेले सापडले. ही पिशवी पूर्व दिल्लीतील कल्याणपुरी येथे ५ जून रोजी सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी अंजन दासच्या पाय, मांडय़ा, कवटी आणि हाताचे अवशेष सापडल्यांतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही तपासले असता पोलिसांनी घटनास्थळी एक महिला आणि एक तरुण संशयास्पदरित्या दिसून आले. पोलिसांनी त्या दोघांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी केली असता मृतदेहाची ओळख पटली आणि हत्याकांडाचे रहस्य उलगडले.