Arvind Kejriwal Bail Stay : दिल्लीच्या कथित मद्य घोटाळा मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस अव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी जामीन मंजूर केला होता. परंतु, दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवालांच्या जामिनाला स्थगिती दिली आहे. तसच याबाबतचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे केजरीवाल यांना काही काळ तिहार तुरुंगातच राहावे लागणार आहे.
गुरुवारी जामीन देण्याचा निर्णय झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला होता. परंतु, केजरीवालांच्या जामीनाच्या निर्णयाला ईडीने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं. केजरीवालांना जामीन मिळाला, तर तपासाच्या महत्वपूर्ण प्रक्रियेवर परिणाम होईल. केजरीवाल मुख्यमंत्री पदावर आहेत, असं ईडीने न्यायालयात म्हटलं.
याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्याची आवश्यकता आहे, असं केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयात सांगितलं. मात्र, न्यायालयाने त्यांची मागणी अमान्य केली. यावर न्यायाधीश सुधीर जैन यांनी म्हटलं की, हायकोर्टात सुनावणी प्रलंबीत आहे. तोपर्यंत खालच्या न्यायालयातील निर्णय प्रभावीपणे लागू होणार नाही.
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह ट्वीटरवर म्हणाले, मोदी सरकारची गुंडगिरी पाहा. आतापर्यंत ट्रायल कोर्टाचा आदेश आला नाही. आदेशाची प्रतही मिळाली नाही. तरीही मोदींची ईडी हायकोर्टात कोणत्या आदेशाला आव्हान देण्यासाठी पोहोचली? या देशात काय चाललंय? न्याय व्यवस्थेची खिल्ली का उडवत आहेत. मोदीजी संपूर्ण देश तुम्हाला पाहत आहे?