सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवालांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, काल केजरीवाल यांना अंतरिम जामीन दिला आणि ते आता प्रचारात सहभागी होतील. आम्हाला सगळ्यांना त्यांच्या येण्याचा आनंद आहे. काल रात्री स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचं स्वागत केलं, अभिनंदन केलं.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, 17 तारखेला मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीची सांगता सभेला आम्ही अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित केलेलं आहे. त्यांनी आमंत्रण स्विकारलेलं आहे. 17 तारखेला मुंबईमध्ये नरेंद्र मोदीसुद्धा आहेत आणि त्याचवेळेला महाविकास आघाडीच्या मंचावर अरविंद केजरीवाल आहेत. असे संजय राऊत म्हणाले.