नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayyed) यांच्या विरोधात भाजप (BJP) चांगलीच आक्रमक झाली असून खारघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच, पोलीस स्टेशनबाहेर भाजपने घोषणाबाजी देखील केली आहे. यावर दीपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा ट्विटरद्वारे भाजपवर निशाणा साधला आहे.
दीपाली सय्य्द म्हणाल्या की, मुख्यमंत्री पदावर पातळी सोडून भाजपच्या नेत्यांनी टीका केली तर त्यांना पंतप्रधानांची आठवण करून दिली जाईल. या प्रक्रियेत भाजपच्या लिंबू-टिंबुना वाईट वाटल तरी त्यांच्या तक्रारींना शिवसेना भिक घालत नाही. जसे पंतप्रधान आदरणीय त्यापेक्षाही जास्त आम्हाला मुख्यमंत्री आदरणीय आहेत. शेवट शिवसेना करणार, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे.
दरम्यान, शिवसेना दीपाली सय्यद यांच्याविरोधात भाजपने खारघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही पोलीस स्टेशनमधून हलणार नाही, असं म्हणत खारघर भाजपने पोलीस स्टेशनमध्येच जोरदार घोषणाबाजी केली. अखेर खारघर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. तसेच भाजपने दिलेले निवेदन स्वीकारले.