शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली. आदित्य ठाकरेंची बदनाही होत होती, त्यावेळी मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करुन त्यांना नारायण राणेंकडून सुरु असलेली बदनामी थांबवण्यासाठी प्रयत्न केले होते असं दीपक केसरकर म्हणाले. आमच्यासारख्या अनेक लोकांना तेव्हा भाजपच्या व्यासपीठावरुन आदित्य ठाकरेंची होणारी बदनामी आवडत नव्हती. त्यानंतरच्या काळात उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये संवाद सुरु झाला. त्यांची भेट देखील झाली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, आपल्या पदापेक्षा मला संबंध महत्वाचे आहेत. त्यामुळे मी हे पद त्यागून पुढचा निर्णय घेतो. ही गोष्ट फक्त रश्मी ठाकरे आणि आम्हाला काही मोजक्या लोकांना माहिती होतं असं दीपक केसरकरांनी सांगितलं. त्यानंतर भाजप आमदारांचं निलंबन केल्यानंतर ही चर्चा थांबली.
दीपक केसरकरांनी सांगितलं की, नारायण राणेंना थेट केंद्रात मंत्रीपद दिलं गेलं, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी नाराज होऊन चर्चा थांबवली. मात्र पुन्हा काही दिवसांनी हे प्रयत्न सुरु झाले. एकनाथ शिंदेंनी सुद्धा आपण भाजपसोबत युती करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली होती. अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर यांच्यासारख्या अनेक लोकांना बोलणीसाठी विनंती केली जात होती. गुवाहाटीला जाण्याच्यावेळी सुद्धा आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र एकनाथ शिंदेंना बाजुला ठेवून आमच्यासोबत या असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे आम्हाला आणि भाजपला सुद्धा ही गोष्ट मान्य नव्हती.