शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर आम्हाला उद्धव ठाकरेंकडून (CM Uddhav Thackeray) मिळालं नाही. राज्याला शांतता हवी असून, ही शांतताच राज्याला समृद्धीकडे घेऊन जाईल, त्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत जाण्याचा, हिंदुत्वासोबत जाण्याचा निर्णय घ्यावा यासाठी आम्ही त्यांना विनंती केली होती. आता तुम्ही लोकांना खोटं सांगू शकतो की, पक्षप्रमुख आजारी असताना हे कारस्थान झालं, मात्र तसं झालेलं नाही. राजकारणाला देखील मर्यादा असतात, राज्यात सध्या अनेक भागांत पूरस्थिती आहे, त्यामुळे शेतात जाऊन पंचनामे करायला मदत करा. आम्हाला वाटत होतं की, मुंबई आमची आहे, मराठी माणसाचं अस्तित्व शिवसेनेमुळे (shivsena) टीकलेलं आहे, मात्र आधी कुणीच मुंबईत फिरताना दिसत नव्हतं असं म्हणत दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.
महाराष्ट्र हे राज्य देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे, त्यामुळे केंद्राचं सहकार्य असणं गरजेचं आहे. रोज उठून केंद्रावर टीका करण्याचं काम काही लोक करत होते, त्यामध्ये राज्यातील जनता भरडली जात होती, त्यामुळे कामाच्या पातळीवर राज्य मागे पडतं. त्यामुळे आता या सर्व गोष्टी थांबवा, तुम्ही तुमचे कार्यकर्ते कसे जवळ ठेवायचे ते पाहा, मात्र आमच्या खासदारांच्या घरावर मोर्चा घेऊन जाण्याचा अधिकार कुणाला नाही. यामुळे राज्यात कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल, पोलिसांना नाईलास्तव लोकांवर कारवाई करावी लागेल असं म्हणत केसरकरांनी धैर्यशील माने यांच्या घरावर गेलेल्या मोर्चाला उत्तर दिलं.