रेमल चक्रीवादळ आज पश्चिम बंगालमध्ये धडकण्याचा हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 110 ते 120 राहण्याचा अंदाज आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये NDRFच्या 12 तुकड्या तैनात करण्याक आल्या आहेत. चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवरही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वाऱ्यांचं चक्री वादळात रूपांतर झालं आहे. या चक्रीवादळाला 'रेमल' असं नाव देण्यात आलं आहे. शनिवारी संध्याकाळी भारतीय हवामान संस्थेनं सांगितलं की, हे चक्रीवादळ रविवारी रात्री उशिरा पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील खेपुपारा दरम्यानच्या किनारपट्टीवर धडणार असल्याचं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. रेमल हे मान्सून आल्यामुळे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं पहिलं चक्रीवादळ आहे.
IMD ने मच्छिमारांना 27 मे च्या सकाळपर्यंत उत्तर बंगालच्या उपसागरातील समुद्रात जाऊ नये, असा सल्ला दिला आहे. दक्षिण आणि उत्तर 24 परगणा सारख्या पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये 26-27 मेसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, या भागात काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. रविवारी म्हणजेच आज हे चक्रीवादळ ताशी 102 किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता असून पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये 26 आणि 27 मे रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.