नवी दिल्ली : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर तपास करणारे एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना ढिसाळ तपास आणि बनावट जात प्रमाणपत्र दाखल केल्याप्रकरणी कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. या प्रकरणाशी संबंधित लोकांनी शुक्रवारी ही माहिती दिली. एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, "शासनाने सक्षम अधिकाऱ्याला वानखेडे यांच्यावर चुकीच्या तपासासाठी कारवाई करण्यास सांगितले आहे. बनावट जात प्रमाणपत्रासाठी त्यांच्यावर कारवाई केली जाईल." वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.
नवाब मलिकांच्या आरोपांनंतर, वानखेडे यांनी (वानखेडे) दलित असल्याचं सिद्ध करण्यासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्या जात प्रमाणपत्राशी संबंधित मूळ कागदपत्रं राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर सादर केली. वानखेडे हे एनसीबीच्या मुंबई झोनचे प्रमुख होते. यावेळी मुंबई जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणाचा प्राथमिक तपास करत होते. याप्रकरणी बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. आर्यनची नंतर उच्च न्यायालयात जामिनावर सुटका करण्यात आली.