चेन्नईमधून (Chennai) लॅपटॉप गुरुग्राम (Laptop Gurugram) येथे नेण्यासाठी लॅपटॉप (Laptop) घेऊन निघालेल्या एका ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनरने कंपनीच्या परस्पर तब्बल पाच कोटी रुपये किंमतीच्या लॅपटॉपची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ब्लु डार्ट कंपनीच्या (Blue Dart Company) चेन्नईच्या गोदामातून एक ट्रक गुरुग्राम येथे लॅपटॉप पोहोचविण्यासाठी लॅपटॉप घेऊन निघाला होता. मात्र रस्त्यामध्ये वर्ध्याच्या (Wardha) दरोड टोल नाक्याच्या परिसरात या ट्रकचा ड्रायव्हर (truck driver) आणि क्लिनरने (Cleaner) तब्बल ५ कोटी ४३ लाख २ हजार ५१८ रुपये किंमतीच्या १ हजार ४१८ लॅपटॉपची परस्पर विल्हेवाट लावून मोठा घोटाळा केल्याची घटना घडली. या प्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात (Wadner Police Station) तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी चालक आणि वाहकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गुरुग्रामचा रहिवासी असणारा मोमीन महमूद खान (Momin Mahmood Khan) आणि त्याचा सहकारी रॉबिन नबाब खान (Robin Nabab Khan) या दोघांनी मिळून हा घोटाळा केल्याची माहिती आहे. हे दोघे १६ मे २०२२ रोजी ब्लु डार्ट कंपनीच्या चेन्नई वेअर हाऊसमधून लॅपटॉप घेऊन गुरुग्रामकडे निघाले होते. त्यांच्याकडे या कंपनीच्या व्यवस्थापकाने ३ हजार ८२४ लॅपटॉप विश्वासाने सुपूर्द केले होते. मात्र चालक आणि वाहकाकडून कंपनीचा विश्वासघात झाला आणि या दोघांनी वर्धा जिल्ह्यातील दरोडा टोलनाका परिसरात आपले वाहन उभे करून ३ हजार ८२४ लॅपटॉप पैकी १ हजार ४१८ लॅपटॉपची परस्पर विक्री केली. या दोघांनी मिळून तब्बल ५ कोटी ४३ लाख २ हजार ५१८ रुपयांचा घोटाळा केल्याची बाब निदर्शनास आली आहे. याप्रकरणी अशफाक मुस्तफा खान (Ashfaq Mustafa Khan) (राहणार कळमाना जिल्हा नागपूर ) यांनी वडनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा दाखल होताच तांत्रिक तपास सुरु केला असून वडनेर पोलिसांनी या दोन आरोपींच्या शोधार्थ गुरुग्रामला एक पोलिसांचे पथक रवाना केले आहे. या पथकामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकासह दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र विक्री झालेला माल परत मिळविण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.