मागील दोन वर्षाहून अधिक काळापासून कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला. या महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आता कुठे कोरोनाचा उद्रेक कमी होत असताना, ऑस्ट्रेलियातून चिंता वाढवणारी बातमी समोर आली. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील एका क्रुझवरील ८०० प्रवासी कोरोना पॅाझिटीव झाले असल्याचे कळाले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडहून परतलेल्या मॅजेस्टीक प्रिन्सेस क्रुझमध्ये ४००० हून अधिक प्रवाशी प्रवास करत होते. त्याच क्रुझवर हा उद्रेक झाले आहे.
प्रिन्सेस क्रुझ हे हॅलिडे क्रुझ आहे. याच हॅलिडे क्रुझवरील प्रवाशांची रॅपिड टेस्ट घेतल्याची माहिती मिळाली, त्या टेस्टमध्ये ८०० प्रवासी कोरोना पॅाझिटीव आढळले असल्याचे समोर आले आहे. पॅाझिटीव प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक करू नये असा सल्ला आरोग्य विभागाने दिला व टेस्टनंतर रुग्णांना आयसोलेशन मध्ये राहण्यास सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियातील स्थानिक बातम्यानुसार, कोरोना पॅाझिटीव रुग्णांना क्रुझवर ५ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रिन्सेस क्रुझने एका निवेदनात ''क्रुझवरील रुग्णांसोबत मेडीकल टीम देखील आहे. या रुग्णांना कोणत्याची प्रकरचा त्रास होणार नाही याची आम्ही दाखल घेऊ'' असे त्यांनी स्पष्ट केले.
मॅजेस्टीक प्रिन्सेस क्रुझ सिडनी नंतर ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या शहरात म्हणजेच मेलबर्नला रवाना होणार होती. न्यू साउथ वेल्समधील अधिकाऱ्यांनी असे स्पष्ट केले की, कोरोना रुग्णांची लाट झापाट्यांने वाढत आहे. आगामी सुट्ट्यांमध्ये ही लाट पुन्हा एकदा पसरणार हे सर्वांच्याच भविष्यासाठी चिंतेची बाब ठरणार आहे. अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.