विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सर्व सरकारी यंत्रणांचा वारेमाप दुरुपयोग करत आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या या दडपहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. सोनियाजी गांधी आजारी असून वयाच्या 70 व्या वर्षी त्यांना चौकशीच्या नावाखाली नाहक त्रास दिला जातोय. मोदी सरकारच्या या हुकूमशाही विरोधात काँग्रेस पक्ष मंगळवार दि. 26 जुलै रोजी पुन्हा एकदा शांततापूर्ण सत्याग्रह करून या कारवाईचा विरोध करेल, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यासंदर्भात बोलताना म्हणाले, नरेंद्र मोदी सरकारच्या सूडाच्या राजकारणाविरोधात मंगळवार दि. २६ जुलै २०२२ रोजी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्यासमोर सकाळी वाजता सत्याग्रह केला जाणार असून, जोपर्यंत सोनिया गांधींना ईडी कार्यालयातुन मुक्त केलं जात नाही तोपर्यंत सत्याग्रह सुरुच राहणार आहे. २१ तारखेला सोनियाजी गांधींना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. आता पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. राहुल गांधींचीही पाच दिवस दररोज १०-१० तास ईडीने चौकशी केली. या चौकशीतून काहीही निष्पन्न झालेलं नाही व होणार नाही. ईडीचे अधिकारी केंद्रातील त्यांच्या ‘बॉस’च्या इशाऱ्यावर नाचत आहेत. चौकशीच्या नावाखाली विरोधकांना त्रास देण्याचे भाजपाचे राजकारण फारकाळ टिकणार नाही.