एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने त्याच्या कुटुंबासह विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना छत्तीसगढची आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पत्नी आणि दोन मुलांसह विष खाल्लं. या चौघांनी विष खाल्ल्याचं लक्षात येताच या चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या चौघांनाही जीव गमवावा लागला आहे. या घटनेने सगळीकडे खळबळ माजली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव (वय ६५, रा. कोतवाली, जांजगीर क्षेत्र वार्ड क्रमांक १०) यांनी त्यांच्या पत्नीसह आणि दोन मुलांसह विष खाल्लं. पोलीस अधीक्षक राजेंद्र जयस्वाल म्हणाले, पंचराम यादव यांनी त्यांची पत्नी नांदणी यादव (वय ५५), मुलगा सूरज यादव (वय २७) आणि निरज यादव (वय ३२) यांच्यासमवेत विष प्राशन केले. त्यानंतर चौघांनाही जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. या चौघांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना बिलासपूर येथे हलवण्यात आले होते. सिम्स रुग्णालयात निरज यादव याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इतर तिघांना हलवण्यात आले होते. दरम्यान ३१ ऑगस्ट रोजी इतर तिघांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, आजूबाजूचे लोक कर्जामुळे त्रस्त असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी हे सामूहिक आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते. मात्र कुटुंबीयांनी हे पाऊल उचलण्याचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.