Sanjay Raut On Sandip Gulave : काँग्रेस नेते संदीप गुळवे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाची जागा शिवसेनेनं महाविकास आघाडी म्हणून लढण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी संदीप गुळवेंसारखा योग्य उमेदवार सापडला नसता. संदीप गुळवेंना शिवसेना नवीन नाही. ते तरुण आहेत. सहकार, शिक्षण क्षेत्रात, मराठा विद्या प्रसारकसारख्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगलं संघटन बांधलं आहे. संदीप गोळवे यांचा पक्षप्रेवश झाल्याने उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला नक्कीच ताकद आणि बळ मिळेल, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
जनतेला संबोधीत करताना संजय राऊत पुढे म्हणाले, मागच्या निवडणुकीत आपले शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जिंकले. आपण सर्वांनी कष्ट केले. संपूर्ण शिवसेनेची यंत्रणा उत्तर महाराष्ट्रात जिल्हा, तालुक्यात शिवसैनिक फिरले, तेव्हा किशोर दराडे जिंकले. सुधाकर बडगुजर यांना जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळालं. जवळपास १५ दिवस ते तिकडे थांबले होते. नाशिकच्या जागेवर शिवसेनेचाच अधिकार आहे. म्हणून ही जागा आपण महाविकास आघाडी म्हणून लढण्याचं पुन्हा एकदा ठरवलं. कुणी सोडून गेला असेल, कुणी वेगळा मार्ग स्वीकारला असेल, त्याचा काहीही परिणाम होत नाही. शिवसेना ही चार अक्षरं एव्हढ्या ताकदीची आहेत, यामागे लोक आपोआप उभे राहतात आणि ताकद वाढत जाते.
संदीप गुळवे यांच्यासोबत शिक्षकांचं फार मोठं संघटन आहे. त्याचाही फायदा होईल. उद्धवसाहेबांनी संदीप गुळवेंच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे. आमच्याकडे परस्पर उमेदवारी घोषित केली जात नाही. उद्धवसाहेबांनी गुळवेंचा पक्षप्रवेश करुन घेण्यास सांगितलं, याचा स्पष्ट अर्थ असा आहे, संदिप गुळवे उमेदवार आहेत. पण महाविकास आघाडी म्हणून सर्व जागा आपण जाहीर करणार आहोत. कोण कुठं लढणार आहे, याबाबत एक दोन दिवसात घोषणा केली जाईल. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातल्या शिवसेनेनं काम करायचं आहे आणि ही जागा आपल्याला जिंकून आणायची आहे.
लोकसभेचे निकाल ४ जूनला लागतील. ही निवडणूक २६ तारखेला आहे. ७ जूनला फॉर्म भरायचे आहेत. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येतील. म्हणजेच निवडणुकीचा हंगाम सुरु झालेला आहे. हा संपूर्ण निवडणुकीचा मोसम हा शिवसेनेचा आहे. प्रत्येक निवडणूक शिवसेना जिंकणार आहे. शिक्षकांच्या मतदारसंघातून संदीप गुळवे हे या राज्यातल्या शिक्षकांचं नेतृत्व करतील, यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. मला खात्री आहे, ते जिंकून येतील, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.