नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा तीन दिवस पुढे स्थगित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती काँग्रेस कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी दिली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे.
दिवाळीनिमित्त राहुल गांधी दिल्लीला गेले आहेत. तर, बहुतांश सदस्य देखील दिवाळीसाठी घरी गेले आहेत. त्यामुळे दिवाळीपर्यंत यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय राहुल गांधी 26 ऑक्टोबर रोजी कॉंग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पदग्रहणनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रा २६ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. व 27 ऑक्टोबर रोजी सर्व पदयात्री पुन्हा भारत जोडो यात्रेत सहभागी होतील.
दरम्यान, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून तामिळनाडूमधील कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत असणार आहे. नुकताच या यात्रेचा 1000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे. यादरम्यान राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत कर्नाटकातील मंड्या येथील या यात्रेत सोनिया गांधीही सहभागी झाल्या होत्या.