2019 मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या टीकेच्या प्रकरणी सुरत न्यायालयाने काल (23 मार्चला) आपला निकाल दिला आहे. न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले असून आता त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. 2 वर्षांच्या शिक्षेमुळे राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्वही धोक्यात आले आहे. त्यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी ३० दिवसांची मुदत देत जामीन मंजूर केला.
याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात काँग्रेसचं जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. सोशल मीडियावर 'डरो मत' आशयाचे प्रोफाईल फोटो बदलण्यात आले आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरील प्रोफाईल फोटो बदलला. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनीही आपले प्रोफाईल फोटो बदलले आहेत. ज्यात ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यानचा आहे, ज्यावर 'डरो मत' लिहिलं आहे.
मोदी आडनावावर टिप्पणी केल्याबद्दल राहुल यांच्यावर गुन्हेगारी मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आजच निर्णय अपेक्षित आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? या संदर्भात भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता.