संदीप गायकवाड, वसई
नवी मुंबई खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला असल्याचा आरोप वसई घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी केला आहे. खारघर येथे १६ एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. भर दुपारी झालेल्या या कार्यक्रमाला आलेल्या १४ श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला तर अनेकांना रुग्णालयात भरती व्हावे लागले होते.
या सर्व घटनेला सरकार जबाबदार असून सत्य परिस्थिती दडवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.सरकारला जाब विचारण्यासाठी वसईतील काँग्रेस भवन येथे काँग्रेसच्या युवानेत्या शिवानी वडेट्टीवार व काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. सरकारने इतका मोठा सोहळा आयोजित करताना केवळ मंत्री व व्हीआयपी लोकांची सुविधा पाहिली मात्र सर्वसामान्य नागरिकांकडे दुर्लक्ष केले. तसेच १३ कोटी इतका निधी खर्च करूनही शासनाने शेड वैगरे का बांधले नाहीत? या दुर्घटनेत सर्वसामान्य नागरिक दगावले आहेत तर काही जण जखमी आहेत याची आकडेवारी सुद्धा सरकार जनतेपासून लपवित असल्याचा आरोप काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार यांनी केला आहे.
या संपूर्ण घटनेला सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार असून गृहमंत्री, मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री व इतर उपस्थित मंत्री यांनी याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा असेही वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारने या कार्यक्रमाचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतला ज्यांचे आज बळी गेले आहेत त्यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना जी काय मदत दिली आहे ती सुद्धा अपुरी आहे. या घडलेल्या घटनेची सत्य परिस्थिती जनतेच्या समोर यावी व भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी मुद्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याच्या संदर्भात पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिले आहे. असेही शिवानी वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव विजय पाटील, काँग्रेस जिल्हाअध्यक्ष ओनील अल्मेडा,कुलदीप वर्तक,अंकिता वर्तक व पदाधिकारी उपस्थित राहून या झालेल्या दुर्घटने बाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.