वाढत्या महागाईची झळ आता जास्तच वाढत चालली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढते आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. यातच आता नवीन वर्षात गॅस दरवाढीची भेट सर्वसामान्यांना मिळाली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे.घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणतीही वाढ झाली नाही. कमर्शियल गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेल, धाबे आदीवरील जेवण महागले. गॅस दरवाढीमुळे जेवणाचा बेरंग होण्याची शक्यता आहे.
1 जानेवारी 2023 रोजी या दरवाढीनंतर दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1769 रुपये झाली. दिल्लीत घरगुती गॅसची किंमत 1053 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये, कोलकत्त्यात 1079 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये भाव आहे. तर सरत्या वर्षात घरगुती गॅसच्या किंमतीत 4 वेळा बदल झाला. चार वेळा गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ झाली. एकूण 153.50 रुपयांची दरवाढ झाली. कोलकत्त्यात गॅस सिलेंडर 1870 रुपये, मुबंईत 1721 रुपये तर चेन्नईमध्ये 1917 रुपये भाव होता. यापूर्वी केंद्र सरकारने सरत्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजीच्या किंमतीत 115.50 रुपयांची कपात झाली.