मयूरेश जाधव : कल्याण| पुढील 24 तास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता देखील आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली राहणार आहे. औरंगाबाद आणि जालन्यातही थंडीची लाट असणार आहे. किमान तापमान 10 अंशांपर्यंत खाली येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहर हे यंदाचं नवं थंड हवेचं ठिकाण बनलं आहे. यंदाच्या हिवाळ्यात पहिल्यांदाच 11.2 अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद बदलापूर शहरात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात गारठा चांगलाच वाढला असून तापमानाचा पारा हा 12-13 अंशांच्या घरात होता.
रविवारी बदलापूर शहरात 11.2 अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. बदलापूर शहरातील हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी त्यांच्या खासगी स्वयंचलित हवामान केंद्रात ही नोंद केली आहे. बदलापूर शहर हे समुद्रापासून दूर आहे. हवेतील आर्द्रता हिवाळ्यात कमी होते. त्यात उत्तरेकडून येणारे थंड वारे बदलापूर शहरात आधी पोहोचत असून ते इकडून मुंबईच्या दिशेने वाहत जातात. त्यामुळे बदलापूर शहरात कमी तापमानाची नोंद होते. त्यापुढे अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यामार्गे मुंबईत हे तापमान वाढत जाते, अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.