मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कोविड हॉस्पिटल तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 50 ते 60 वयोगटातील वृद्ध नागरिकांची काळजी घेण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. तसंच मास्क घालण्याचं आवाहन सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलं आहे. महत्वाचं म्हणजे, 5 ते 7 दिवसात जर कोरोनाचे रुग्ण आणखीन वाढले तर महाराष्ट्रात कठोर निर्णय घेतले जातील अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
फिल्ड रुग्णालये सुसज्ज ठेवा
कोविड कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये व्यवस्थित आहे का पहा. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे. या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आहेत का, आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याचा आढावा घ्यावा, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या.
कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोविड विषाणूचा नवीन व्हेरियंट आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे, यावर लक्ष ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. लवकरच शाळा सुरू होतील. शाळेच्या बाबत जागतिक स्तरावर काय निर्णय घेतले गेले आहेत, तेथील मुलांना संसर्ग होण्याची स्थिती काय आहे, याबाबत माहिती घ्यावी, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी कोविड टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. अजित देसाई, डॉ. बजान, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. तात्याराव लहाने यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आपली मते मांडली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन
· ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तत्काळ कोविड चाचणी करुन घ्या
· गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरावा
· बारा ते अठरा वयोगटातील लसीकरण वाढवा.
· ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, बूस्टर लस घ्यावी
· आरोग्य व्यवस्थेने पायाभूत सुविधांची तयारी करुन ठेवावी
· ऑक्सिजन, औषधे यांचा साठा करुन ठेवावा.
· येणाऱ्या पावसाळ्यामुळे जलजन्य आजार देखील डोके वर काढतात, त्यांची लक्षणे कोरोना सारखीच असल्याने डॉक्टरांनी देखील अशा रुग्णांना वेळीच चाचण्या करून घेण्यास सांगावे.