'Dharmaveer 2' Poster Launch : शिवसेना संघटनेत सिंहाचा वाटा असणाऱ्या दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनप्रवासावर 'धर्मवीर' सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शीत करण्यात आला होता. ठाण्याला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्यापासून मातोश्रीपर्यंत भगवा फडकवण्याची ताकद दिघे यांच्या मनगटात होती. अनेकांसाठी ते देवच होते, असं शिवसैनिक सांगतात. धर्मवीर सिनेमा पडद्यावर झळकल्यानंतर तमाम प्रेक्षकांना 'धर्मवीर २' चे वेध लागले आहेत. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते 'धर्मवीर २' सिनेमाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगावकर, बॉबी दिओल, प्रसाद ओक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील इतर अभिनेते उपस्थित होते. यावेळी शिंदेंनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिंदे यांनी आनंद दिघे यांची मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते प्रसाद ओक यांचे आभार मानले. तसेच सिनेमा बनवण्यासाठी ज्यांचं ज्याचं योगदान लाभलं, त्या सर्वांचे आभार शिंदे यांनी व्यक्त केले.
एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे याआधी प्रदर्शीत केला आहे. आता 'धर्मवीर २' करणार आहोत. आनंद दिघे साहेबांच्या सिनेमाला सहकार्य करणं म्हणजे मी भाग्यवान आहे, असं समजतो. धर्मवीर आनंद दिघे माझे गुरु आहेत. त्यांच्या सावलीत माझी वाटचाल सुरु झाली. त्यांच्याकडून मी राजकारणाचे समाजकारणाचे धडे घेतले. मी त्यांची कार्यपद्धती पाहिली आहे.
कोणतंही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयावर त्यांनी अढळ स्थान निर्माण केलं होतं. कुणाचंही सुख दु:ख असूद्या, कुणाचा शाळेचा प्रवेश असू द्या, कुणाचा रुग्णालयातील उपचार असूद्या, सर्व मोठ मोठी काम केली. आनंद आश्रम हा त्यांचा शेवटचा रस्ता होता. शेवटची ट्रेन पकडून लोक आश्रमात यायचे आणि सकाळी पहिली ट्रेन पकडून जायचे. इतका वेळ ते लोकांना द्यायचे.
आम्ही त्यांच्यासोबत काम करायचो. कार्यकर्ते म्हणून आम्हालाही त्यांचा अभिमान होता. त्यांचा संघर्ष आणि लढा नेहमी जनतेसाठी होता. सर्व सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी होता. त्यांचं बँकेत खातंही नव्हतं. असं व्यक्तीमत्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एव्हढं लोकप्रिय झालं, पण दुर्देवाने नको ते घडलं आणि आम्हाला सोडून गेले. हा दुख:द प्रसंग पचवण्यासारखा नाही. एकही क्षण असा जात नाही की आनंद दिघे साहेबांची आठवण येत नाही.
प्रत्येक पावलो पावली दिघे साहेबांची आठवण येते. 'अरे एकनाथ', असं ते म्हणायचे. पण ते शब्द आजही कानावर पडल्यासारखे वाटतात. मी मुख्यमंत्री म्हणून नाही, तर या राज्यातला जनतेचा सेवक असल्याचं मी स्वत:ला समजतो. महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची मला संधी मिळाली आहे, यामागे आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आहे. त्यांची प्रेरणा आहे.
जसे बाळासाहेबांचे आशीर्वाद आहे. त्यांचं जीवनपट एका सिनेमातून उलगडू शकत नाही. पहिला सिनेमा काढल्यावर लोक म्हणायचे पुढे काय? आगे आगे देखो होता है क्या...कारण त्यांचं जीवन, त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेला संघर्ष आणि लढा म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी टोकाचा निर्णय घेणारे आनंद दिघे साहेब आम्ही पाहिले आहेत. महाराष्ट्रातच नाही देशभरात, जगभरात पहिला सिनेमा पोहोचला. लोकांच्या मागणीनुसार 'धर्मवीर पार्ट' २ चा पोस्टर प्रदर्शीत झाला आहे.
हा सिनेमा लवकरच प्रदर्शीत होईल. प्रसाद ओक आनंद दिघे साहेबांना भेटले नव्हते. त्यांना कधी पाहिलं नव्हतं. परंतु, त्यांनी लोकांशी बोलून दिघे साहेबांची संपूर्ण माहिती घेतली. प्रसादने दिघे साहेबांची हुबेहुब भूमिका केली आहे. पूर्वी एकनाथ शिंदे कसा होता, लोकांसाठी कसं काम करायचो, ते क्षितीजने दाखवलं. त्याचंही मी मनापासून अभिनंदन करतो. पहिला सिनेमा २०२२ ला सुपरहिट झाला. सर्व पुरस्कार कलाकारांना मिळाले.