CM Eknath Shinde Speech : विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आणि शिवसेना शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार निवडून आल्यानं महायुतीनं ९ पैकी ९ जागा जिंकल्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात महाविकास आघाडीवर निशाणा साधला. "आम्ही महायुतीचं गणित नीट केलं. यामध्ये कुणी किती मतं घ्यायची, कुणी कुणाला पाडायचं? हे महाविकास आघाडीत आपापसात सुरु झालं. तिथेच बिघाडी झाली. विरोधक म्हणतात, सुडाचं राजकारण केलं. तुम्ही अडीच वर्षात किती सुडाचं राजकारण केलं? मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलले म्हणून नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवलं आणि त्यांना अटक करण्याचं काम तुम्ही केलं. हनुमान चालीसा वाचणाऱ्या राणा दाम्पत्याला देशद्रोहाचं कलम लावून १२ दिवस त्यांना जेलमध्ये टाकलं. कंगना राणावतचं घर तोडलं", असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे. ते आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात बोलत होते.
शिंदे पुढे म्हणाले, अर्नब गोस्वामी आणि राहुल कुलकर्णींना अटक केली. सुडाचं राजकारण तुम्ही केलं. आम्ही सुडाचं राजकारण केलं नाही. सत्तेवर लात मारून आम्ही पायउतार होण्याचा धाडसी निर्णय घेतला. आम्ही इतिहास घडवला. सरकारमधून बाहेर पडायला हिंम्मत लागते. ती हिम्मत आम्ही दाखवली. जनतेच्या मनातलं सरकार आणलं. दोन वर्ष हे सरकार चाललं. दोन वर्षात आम्ही अनेक कामं केली.
महायुती हेच राज्याचं आणि देशाचं भविष्य आहे. कारण जनता आमच्या सोबत आहे. जे काही आम्ही केलं आहे, ते जनतेसमोर आहे. मोदीजी प्रधानमंत्री झाले म्हणून पेढे वाटताय की तुम्ही तिसऱ्यांदा हारले म्हणून पेढे वाटताय. हे सर्व लोक एकत्र आले, तरीसुद्धा मोदींना हरवू शकले नाहीत. मोदी प्रधानमंत्री झाले, या राज्याला पाठबळ मिळेल.
अमित शहांचा भक्कम पाठिंबा आम्हाला मिळतोय. आम्ही जे काही प्रस्ताव पाठवतोय, त्यात एकही पैशाची कपात न होता, ते प्रस्ताव मंजूर होत आहेत. विरोधक म्हणतात आम्हाला केंद्राने पैसै दिले नाही, दुजाभाव करतात. मग तुमच्या काय घरी आणून देणार की फेसबुक लाईव्हवर देणार? हे सरकार फेसबुक लाईव्हनं चालत नाही. हे सरकार फेस टू फेस चालतं, असंही शिंदे म्हणाले.