CM Eknath Shinde Press Conference : छत्रपती शिवाजी महाराजांची बहुप्रतिक्षीत वाघनखं महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते साताऱ्यात भव्यदिव्य सोहळा पार पडला. यावेळी शिंदे आणि फडणवीस यांच्यासह शिवप्रेमींनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचं दर्शन घेतलं. या पार्श्वभूमीवक एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या तमाम शिवप्रेमींसाठी ही गौरवाची गोष्ट आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्याचा कट अफजल खानने रचला होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या वाघनखांच्या माध्यमातून अफजल खानाचा वध केला. हा दिवस शौर्यदिन म्हणून ओळखला जातो. आता तीच वाघनखं महाराष्ट्रात दाखल झाली आहे. लोक या वाघनखांची खूप प्रतिक्षा करत होते. या वाघनखांचं आम्हाला दर्शन झालं. आता लोकांसाठीही ही वाघनखं दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. नकली वाघांना छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व कळणार नाही. त्यांची नियतही नकली आहे, त्यांची बुद्धीही नकली आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
लंडनच्या व्हिक्टोरीया अँड अलबर्ट म्यूझिएममधून शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात आणली आहेत. तीन वर्षांसाठी ही वाघनखं आणली असून त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही वाघनखं राज्यातील ४ संग्रहालयांमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम, कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये ही वाघनखं ठेवण्यात येणार आहे.