पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणारी 'इंडिया आघाडी'ही फुटली आहे. २०१४ लाही ते एकत्र आले, पण त्यांना जनतेनं जागा दाखवली. २०१९ लाही ते एकत्र आले, आरोप केले. पण त्यांना पुन्हा जागा दाखवली. मोदींनी सांगितलं आहे, २०२४ ला ४०० पार होणार, लोकांनी त्याची गॅरंटी घेतली आहे. मोदींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला आहे. देश पुढे जात आहे. देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे. विरोधक प्रधानमंत्रीपदाचा उमेदवारही देऊ शकत नाहीत. फक्त मोदी द्वेषाने पछाडलेले लोक आहेत. राज्यात अनेक निर्णय आम्ही घेतले, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना अधिक मजबूत होत आहे. लोकाभिमूख होत आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बबनराव घोलप यांच्या शिवसेना पक्षप्रवेशादरम्यान पत्रकार परिषदेत म्हणाले.
शिंदे म्हणाले, बबनराव घोलप यांचं मनापासून धन्यवाद करतो. कोणत्याही प्रकारची मागणी त्यांनी माझ्याकडे केली नाही. समाजाला न्याय देणं, हाच विषय त्यांनी बैठकीत ठेवला. ते राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष आहेत. ते राज्यभर आणि देशभर समाजासाठी काम करतात. पूर्वी मंत्री होते, आमदार होते, त्यावेळी समाजाला न्याय देण्यासाठी तसच मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. बैठकीत काही विषय चर्चेला आले. चर्चा चांगली झाली आणि आम्ही अनेक निर्णयही घेतले. मुंबईत आयएएस, आपीएस अकॅडमीचं २०० कोटी रुपयाचं मोठं भवन उभं राहील, अशाप्रकारचा निर्णय घेतला. समाजाला न्याय मिळवून देण्याची त्यांची भावना होती. त्यांनी बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचाराने चालणाऱ्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. राज्यभरात चर्मकार समाजाची प्रगती कशी होईल, यासाठी मी त्यांना जबाबदारी देतो.
राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी आता काम करायचं आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी असेल त्यांच्यासाठी सरकारने चांगल काम केलं आहे. सर्व घटकांना न्याय देण्याचं आणि अडचणी सोडवण्याचं काम आमच्या सरकारने केलं आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारे सर्व निर्णय आम्ही घेतले आहे. अल्पावधीतच हे सरकार लोकप्रिय झाले आहेत. हे जनतेचं सरकार आहे. हे लोकांचं सरकार आहे. आपल्याला सर्व ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिंगोली, रामटेकला सर्वसामान्य लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. बबनराव घोलप यांनी योग्य निर्णय घेतला आहे. पण थोडा आधी घ्यायला पाहिजे होता. ज्या माणसाने समाजासाठी काम केलं त्याला तुम्ही वापरून फेकून दिलं होतं. हजारो, लाखो लोक साथ देत आहेत, असंही शिंदे म्हणाले.
राजस्थानचे आमदारांनी गेल्या आठवड्यात प्रवेश केला. आणखी दोन आमदार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. श्रीकांत शिंदे यांना उशिरा उमेदवारी जाहीर केली, यावर बोलताना शिंदे म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचं. दुसरा कुणी असता तर पहिल्या नंबरला यादीत नाव असतं. मी मुख्यमंत्री असलो तरीही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे. आमच्याकडे एका मतदारसंघात एकापेक्षा एक सरस दहा-दहा उमेदवार आहेत. आता तिकीट कसं द्यायचं, मुल्यमापन कसं करायचं, असा आमच्यासमोरचा पेच आहे. दोन प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसची काय अवस्था केली आहे. त्यांच्याकडे अजेंडाही नाही आणि झेंडाही नाही. ते आमच्यावर आरोप करतात, त्यांची अवस्था काय आहे, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
ज्याला उमेदवारी मिळणार नाही, त्याला सन्मान देणं. त्याचं पुनर्वसन करण्याचं काम शिवसेना करते. महायुतीत कुणी कोणाची कोंडी करत नाही. आमच्यात समज गैरसमज नाहीत. सर्वांना न्याय मिळेल. चांगल्या उमेदवारांना संधी मिळेल. राज्याचा ४५ पारचा अजेंडा आहे. संजय राऊत यांच्याविरोधात काँग्रेसने आंदोलन केलं आहे, यावर बोलताना शिंदे म्हणाले, आता तर सुरुवात झाली आहे. हेमंत गोडसेंच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरु आहे. महायुतीचे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडणू आणणं आणि दिल्लीत पाठवायचे आहेत. बाळासाहेबांचं स्वप्न मोदी साकार करत आहेत. मोदींचे हात बळकट करणं आमची जबाबदारी आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
बबनराव घोलप काय म्हणाले?
गेले ५४ वर्ष शिवसेनेत काम केलं आहे. बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून निष्ठेनं काम केलं. उबाठा गटाने माझ्यावर अन्याय केला. मला अचानक संपर्कप्रमुख पदावरून दूर केलं आणि माझ्याकडून जबाबदाऱ्या काढल्या. माझी काय चूक झाली असं मी विचारलं, तर मला काहीच उत्तर मिळालं नाही. त्यामुळे मी शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. निषेध व्यक्त केला. मला कुणीही त्याबद्दल काही विचारणा केली नाही. मी शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला. दोन महिने झाले तरी मला कुणीच काही विचारलं नाही. मग मला असं वाटलं की माझी उबाठा गटात गरज नाही. एकनाथ शिंदे साहेब अतिशय उत्साहाने गोर गरिब जनतेसाठी काम करत आहेत, त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी त्यांच्यासोबत शिवसेनेत आलो आहे. साहेबांसोबत मी समाजाचे सर्व प्रश्न मांडले, त्यांनी त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.