बारामतीत विद्या प्रतिष्ठान संस्थेत नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ज्येष्ठ नेते आणि माजी कृषी मंत्री शरद पवार, सुप्रिया सुळे, नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. या मेळाव्यात जनतेला संबोधित करताना शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. बारामती राज्याच्या विकासाचं मॉडेल आहे. बारामतीच्या विकासात शरद पवार आणि अजित पवार यांचं मोठं योगदान आहे. विकासकामांचं प्रत्यक्ष जाऊन उद्घाटन करावं, अशा वास्तू बारामतीत आहेत. आमचं सरकार लोकाभिमूख आहे. हे सरकार सर्वसामन्यांचं आहे. त्यामुळे विकासात आम्ही राजकारण आणत नाही. आमचं सरकार राजकारणविरहीत आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करतो, असं शिंदे या मेळाव्यात भाषण करताना म्हणाले.
शिंदे लोकांना संबोधित करताना पुढे म्हणाले, महामेळाव्यात मार्गदर्शनही होईल आणि नोकऱ्याही मिळतील. या मेळाव्याच्या माध्यमातून स्वत:चं आणि राज्याचं भवितव्य घडवण्यासाठी मोठी संधी तयार झाली आहे. मी सगळ्यांच या रोजगार मेळाव्यात स्वागत करतो. याआधी नागपूर लातूर आणि नगरमध्ये मेळावे झाले. बारमतीत पोलिसांनाही चांगल्या सोयी सुविधा दिल्या. बारामतीचा विकास होताना सरकार हात आखडता घेणार नाही. मराठा आरक्षणानंतर भरती प्रक्रियेत मराठ्यांनाही लाभ मिळणार आहे.
भारत देश तरुणाईचा देश आहे. मोदींनी थेट अपॉईंटमेंट लेटर देण्याचा उपक्रम राबवला. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून २ कोटी ६० लाख लोकांना लाभ मिळाला. बाळासाहेब आणि पवारांची चांगली मैत्री होती. सर्वसामन्यांना न्याय मिळाला पाहिजे हा सरकारचा अजेंडा आहे. बारामतीचा विकास होताना सरकार हात आखडता घेणार नाही. राज्यात उद्योग आले तरच रोजगार मिळणार आहे. विकास करणारं हे राज्य सरकार आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे या मेळाव्यात म्हणाले.