कडक उन्हाळा महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येत रॅलीत सहभागी झाले होते. नाशिक आणि दिंडोरीच्या आगामी निवडणुकीत हेमंत गोडसे आणि भारती पवार प्रचंड मताधिक्क्यानी विजयी होतील, असा आम्हाला विश्वास आहे. कारण गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी यांनी केलेलं काम काँग्रेसला पन्नास-साठ वर्ष करता आलं नाही. मोदींनी या देशाला विकासाकडे नेण्याचं काम केलं आहे. राज्यात महायुतीने दोन वर्षात केलेली विकासकामे, सर्वसामान्यांसाठी सुरु केलेल्या योजना पाहता दिंडोरीकर आणि नाशिकचे नागरिक या निवडणुकीत उमेदवारांना प्रचंड मतदान करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
शिंदे माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, उमेदवारी जाहीर करायला उशिर झाला होता, त्यामुळे काही अडचण येईल का, यावर बोलताना शिंदे म्हणाले, आता सर्व लोक कामाला लागले आहेत. निवडणुका आल्यावर काम करायचं, असं आम्ही करत नाही. आमचं चोवीस तास काम सुरु असतं. महायुतीचे सर्व कार्यकर्ते फक्त निवडणुकीत किंवा घरी बसून काम करत नाहीत. फेसबुक लाईव्ह करत नाहीत. त्यामुळे आमचं काम चोवीस तास सुरु असतं.
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आमचे कार्यकर्ते काम करत नाहीत. आमचे कार्यकर्ते सतत काम करतात. त्यामुळे आमचा विजय पक्का आहे. आज त्यांनी मोठ्या प्रमाणावर रॅलीत सहभाग घेतला. शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली. ते म्हणाले, आम्ही बाहेर पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. तुम्ही पुन्हा या, तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री बनवतो, असं त्यांनी सांगितलं होतं.
पण मी मुख्यमंत्री बनण्यासाठी हा निर्णय घेतला नव्हता. जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांची फारकत होते, त्यावेळी वैचारिक भूमिका घेऊन आम्ही गेलो. दिल्लीतही त्यांनी निरोप दिला होता, यांना कशाला घेता, आम्ही सगळेच येतो. पण त्यांच्याकडे शिवसेना राहिली नव्हती. ५० लोक माझ्यासोबत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे बोलले, त्यात सत्यता आहे.
नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक आणि आमचे लोक संजीव नाईक यांना भेटले. त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्यामुळे महायुतीचं काम सर्व लोक करतील. ही निवडणूक एका मतदारसंघासाठी नाही. ही निवडणूक मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आहे. या देशाला महासत्ता बनवण्यासाठी आहे, असंही शिंदे म्हणाले.