शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी ईडीचं (ED)पथक दाखल झालं आहे. सकाळीच ईडीची टीम राऊत यांच्या घरी दाखल झाली. मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सकाळी 7.15 च्या सुमारास ईडीचं हे पथक संजय राऊत यांच्या घरी पोहोचले. जवळपास 10-12 अधिकारी त्यांच्या घरी असल्याची माहिती आहे. राऊत यांच्या घरावर छापा पडल्याचं कळताच शिवसैनिकांनी राऊतांच्या बंगल्याबाहेर गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी (shivsena) राऊत यांच्या घराच्या बाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. आज ते विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी त्यांना मुंबईतील संजय राऊतांवरील ईडी कारवाईबाबत विचारण्यात आले. यावेळी त्यांनी इथे विकासकामांची मोठी कारवाई करायचीय असे उत्तर देत राऊतांवरील प्रतिक्रिया टाळली आहे.
ईडीचे दिल्लीतील अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. हे अधिकारी आल्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर बॅरिकेटींग करण्यात आले आहे. या परिसरात साखळी आणि लॉक लाऊन गेट बंद करण्यात आला आहे. तसेच ईडी कार्यालयाभोवती पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. राऊत यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.