Eknath Shinde Press Conference : सलमान खानच्या घराजवळ गोळीबार झाल्याच्या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हा दुर्देवी प्रकार आहे. मी सकाळी सात वाजता पोलिस अधिकाऱ्यांशी बोलून सलमान खानच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी सूचना दिल्या. सलमान खानशीही बोलणं झालं. त्यांनाही दिलासा दिलाय. कायदा हातात घेणाऱ्याला पाठिशी घातलं जाणार नाही, ज्यांनी हे केलं आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल.
माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोठी प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले, सर्वसामान्य माणसाला, दलित, शोषित, पीडितांना न्याय देण्याचं काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. त्यांना ज्ञानाची, न्यायाची ओळख निर्माण व्हावी यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, हे बाबासाहेबांचं ब्रीदवाक्य होतं. बाबासाहेबांनी या देशासाठी जे सर्वोत्तम काम केलंय, ते प्रत्येकाच्या हृदयात कायम आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बाबासाहेबांचे इंदू मिलचं स्मारक, दिक्षाभूमीचं स्मारकात रुपांतर करण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. राज्य सरकारही जगाला हेवा वाटावं असं भव्यदिव्य स्मारक इंदू मिलमध्ये करणार आहे.
१९ जून २०१५ ला मोदींनी बाबासाहेबांचं संविधान दिन सुरु केलं. दरवेळी निवडणुका आल्यावर विरोधक संविधान बदलणार असं सांगतात. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. पण मोदींनी त्यांच्या भाषणात सांगितलं आहे, बाबासाहेबांच्या संविधानावरच देशाचा कारभार सुरु आहे. संविधान बदलण्याची कुणाची हिंमत नाही. बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव करण्याचं पाप काँग्रेसने केलं आहे. त्यामुळे त्यांना याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असंही शिंदे म्हणाले.
भाजपच्या जाहीरनाम्याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, जाहीरनाम्यात गरिब, महिला, शेतकरी, सर्वसामान्य माणूस या देशाच्या प्रमुख चार घटकांवर मोदींनी फोकस केला आहे. मोदींनी जे काम केलं आहे, ते गेल्या ५०-६० वर्षात काँग्रेसला जमलं नाही. देशाला विकासाकडे नेण्याचं काम मोदींनी केलं आहे. वचननामा मोदी पूर्ण करतात, ही गॅरंटी जनतेला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करतात, यावर बोलताना शिंदे म्हणाले, गेले ५०-६० वर्ष राहुल गांधी म्हणतात शेतकऱ्यांना एक लाख रुपये देणार. पण मोदींनी मुद्रा योजनेतून २० लाख रुपयांपर्यंतची मर्यादा वाढवली आहे. त्यांनी टीका करावी, मोदी या टीकेला कामाने उत्तर देतात.