मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधीपक्ष नेते अजित पवार यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाल्याच्या अभिनंदन प्रस्तावावर भाषण केलं. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचं कौतूक केलं. अजित पवार यांच्या शिस्तीचं, वेळ पाळण्याचं, ग्रामीण भागात काम करण्याचं, शेतीची माहिती असण्याचं आणि ग्राऊंडवर काम करण्याचं कौतूक केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की अजित पवार हे नेहमी वेळ पाळतात. स्वत:च्या चुकांबद्दल ते खुलेपणाने बोलतात. अजित पवार यांना ग्रामीण भागाचा, कृषी क्षेत्रात काम करण्याची चांगली फस्ट हँड माहिती आहे. शरद पवार यांच्या कुटुंबातून येत असल्यानं त्यांना त्या छायेतून बाहेर येणं सोपं नव्हतं. मात्र तरी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात अजित दादांनी आपलं वेगळं स्थान तयार केलं. अजित दादा आणि माझी जन्मतारिख एकच आहे, ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. मात्र त्यांची खास स्टाईल तरुणांनाही आवडते. अधिकाऱ्यांवर त्यांचा चांगला वचक असून, कामाबद्दल माहिती असल्यामुळे अधिकारी त्यांची दिशाभूल करु शकत नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले आहेत. आजवर महाराष्ट्राला गोपीनाथ राव मुंडे यांच्यासारखे दिग्गज विरोधीपक्ष नेते लाभले आहेत. मला अजित दादा विरोधीपक्ष नेते होत असल्याचा आनंद आहे, कारण विरोधीपक्ष नेता हा प्रगल्भ असावा लागतो. कधी विरोध तर कधी समजून सुद्धा घ्यावं लागतं. विरोधीपक्ष नेता म्हणून ज्या विधायक सुचना असतील, त्या आम्ही अमलात आणू, तसंच तुमच्या अनुभवातून सुद्धा आम्हाला ज्या गोष्टी शिकायला मिळतील त्या आम्ही शिकू. जोपर्यंत या पदावर तुम्ही आहात तोपर्यंत या पदाला न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आपलं भाषण संपवलं.