मुंबई : मुंबई : शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि भाजपसोबत (BJP) जाऊन सरकार स्थापन केलं. या सरकारचे मुख्यमंत्री स्वत: एकनाथ शिंदे झाले. त्यानंतर आता जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. मात्र राज्यात अजूनही मंत्री मंडळ विस्तार झालेला नाही. एकनाथ शिंदे यांनी मागच्या महिनाभरात अनेकदा दिल्ली वारी केली असून, अद्यापही मंत्रीमंडळाच्या यादीवर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसत नाही. त्यानंतर आता अखेर मंत्री मंडळ विस्ताराला मुहूर्त मिळल्याचं दिसतंय. उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार असून शपथविधी पार पडणार आहे अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता या मंत्रीपदाची माळ कुणा-कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं आता तेवढंच महत्वाचं आहे.
सत्ता स्थापन झाल्यानंतर सव्वा महिना उलटून गेला तरीही मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने विरोधकांकडून शिंदे सरकारला लक्ष्य करण्यात येत होते. परंतु, अखेर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त मिळाला असून उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर, उद्याच मंत्र्यांचा शपथविधीही पार पडणार आहे. यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. 15 ते 16 आमदारांचा शपथविधी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. व 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान पावसाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळात कुणाचा समावेश असणार यावरुन वेगवेगळ्या चर्चा सुरु असतानाच, संभाव्य मंत्रीमंडळाची यादी इच्छुकांच्या मनात धाकधूक निर्माण करतेय. पहिल्या टप्प्यात भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, बबनराव लोणीकर, नितेश राणे यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडेल अशी शक्यता आहे. तर शिंदे गटाच्या शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावं समोर आली आहे. यातली बहुतांश मंडळी अशी आहेत, जे शिवसेनेमध्ये असताना मंत्री होते. त्यामुळे भाजपने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मुंबईवर तर शिंदे गटाने मराठवाडा आणि इतर ठिकाणांवर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसतंय.