शिवसेनेविरोधात बंडखोरी करून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे आता उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. पुढच्या काही दिवसातच राज्यात बीएमसीसह अनेक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपसोबत युती करून शिवसेनेला धक्का देण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे गटातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, औरंगाबादसह अनेक महापालिकांच्या निवडणुका ते भाजपसोबत लढवणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट आणि भाजप आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
सध्या भाजप आणि शिंदे गटामध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक बैठक झाली आहे. शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आहे. त्यानंतर ही पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. शिंदे यांनी यापूर्वीच औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याची घोषणा केली आहे. औरंगाबादमधील शिवसेनेचे सहाही आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेना आधीच अडचणीत आली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिंदे गट एकत्र निवडणुकांना सामोरं गेल्यास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची कोंडी होऊ शकते.
औरंगाबादचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ, रमेश बोरनारे आणि प्रदीप जैस्वाल हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. याशिवाय अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. महापालिका निवडणुकीतील जागावाटपाबाबत सध्या पहिली बैठक झाली आहे. बैठकांमध्ये संमत झालेल्या ठरावावर भाजपच्या हायकमांडशी चर्चा करून अंतिम फॉर्म्युला ठरवून निवडणुकीत उतरण्याची तयारी केली जाईल. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ स्थापनेबाबत एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये अद्याप समझोता झालेला नाही. जवळपास तीन आठवडे उलटून गेले असून, आजपर्यंत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय एकाही मंत्र्याने शपथ घेतली नाही.