अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद वाढतचं चाललं आहे. उर्फी जावेदच्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत उर्फीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. उर्फीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना उत्तर देत आहे. आता पुन्हा चित्रा वाघ यांनी उर्फीबाबत वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
तुम्ही उर्फी जावेदला साडी चोळी किंवा एखादा छान ड्रेस का गिफ्ट करत नाही? असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर देत पुन्हा एकदा उर्फीवर टीका केली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, “साडी-चोळी देण्यासाठी समोरची पण त्या लायकीची लागते. साडी-चोळी हा आमच्या सात्विकतेचा पोषाख आहे. साडी-चोळी पाठवायचं काम आम्ही करू. थोबाड फोडायच्या आधी एकदा संधी देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे एकदा साडी-चोळीही तिला देऊ. तुम्ही दिलेला सल्ला मला मान्य आहे.” असं त्या म्हणल्या.
चित्रा वाघ यांनी यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही निशाणा साधला. “मी पक्षाचे अध्यक्ष होते तेव्हा त्या शहराध्यक्ष होत्या. आणि मैत्रीण ती काय एकटी नाही. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत. आणि मी मैत्रीणीसारखंच ट्रीट केलं. वितुष्ट येण्याचं काही कारण नाही. कसला आकस? माझ्या मैत्रीला तुम्ही पुण्यावाल्यानं जास्त गोंजारलं”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
दरम्यान उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने यामध्ये अंगभर कपडे घातल्यानंतर तिला एलर्जी होत असल्याचं म्हटलं आहे. अंगभर कपडे घातल्यामुळे तिच्या त्वचेला त्रास होतो असं उर्फीचं म्हणणं आहे.