पुण्यातील पूरस्थितीच्या शक्यतेनंर मुख्यमंत्री शिंदे अलर्ट मोडवर आहेत. पूर रेषेतील नागरिकांचं स्थलांतर करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षेबाबत सूचना पाहायला मिळत आहेत. नागरिकच्या सुरक्षेकडे मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष आहे. स्थलांतरित केलेल्या नागरिकांच्या खाण्या पिण्याची सोय करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदेंनी दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे आणि जिल्हा परिसरात आज जोराचा पाऊस होत असून या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत.
पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरातील पूररेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे. या विसर्गामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बाधित होऊ शकणाऱ्या एकतानगर, दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजी नगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरीस ब्रीज, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प , रावेत, बालेवाडी गावठाण, ज्युपीटर हॉस्पिटल परिसर, कपिल मल्हार परिसर, बाणेर, बावधन, संगमवाडी इत्यादी सखल भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.