Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh: छत्रपती शिवाजी महाराजांची बहुप्रतिक्षीत वाघनखं अखेर मुंबईत दाखल झाली आहेत. वाघनखं महाराष्ट्रात दाखल झाल्याने १९ जुलैला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते सात्याऱ्यात भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे. लंडनच्या व्हिक्टोरीया अँड अलबर्ट म्यूझिएममधून शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात आणली आहेत. तीन वर्षांसाठी ही वाघनखं आणली असून त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही वाघनखं राज्यातील ४ संग्रहालयांमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम, कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये ही वाघनखं ठेवण्यात येणार आहे.
"छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहेत. जेव्हा कर्मांची क्रुरता वाढते, तेव्हा देव अवतार घेतो. तेव्हा देव छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवून देतो. राज्याभिषेक होऊन ३५० वर्ष पूर्ण झाले आहेत. ५ नोव्हेंबर २०२२ ला माझ्याकडे एक प्रस्ताव आला होता की, हिंदवी स्वराज्याला संपवण्याचा कट रचणाऱ्या अफजल खानला ज्या वाघनखांच्या माध्यमातून संपवून टाकण्यात आलं होतं, ती वाघनखं महाराष्ट्रात दर्शनासाठी आणली जाऊ शकतात का? अशी मागणी करण्यात आली होती.
आमचे छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेचे भक्त होते. याच पवित्र दिवशी आम्ही तो एमओयू केला. ही वाघनखं तीन वर्षांसाठी आम्हाला दर्शनासाठी मिळावेत. ते स्थायी स्वरुपात आमच्या देशात राहतील, याचा पुढे प्रयत्न करू", अशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना लंडनमध्ये दिली होती.