लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात महत्त्वाच्या बैठका सुरु आहेत. मविआत जागावाटपाचा तिढा कायम आहे. तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शाहू महाराज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधून कोल्हापूरच्या उमेदवारीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित केल्याचं ठाकरेंनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं.
माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, " आज सोलापुरात शाहू महाराजांची भेट घेतली आहे. ठाकरे कुटुंब आणि छत्रपती शाहू महाराजांचं ऋणानुबंध माझ्या आजोबांपासून आहेत. आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांना उमेदवारी निश्चित झाली आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही.
कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मी महाराजांना वचन दिलंय, प्रचाराला तर येणारच. पण विजयाच्या सभेलाही येणार. जो संघर्ष सुरु आहे, त्यात विजय मिळावा म्हणून महाराजांचे आशीर्वादही घेतले आहेत. यामध्ये लपवून ठेवण्यासारखं काहीच नाही, जे काही आहे, ते जगजाहीर असतं. १९९७-९८ सालानंतर मी आज या ठिकाणी आलो आहे"