अमोल धर्माधिकारी, पुणे
आज ( ३ ऑगस्ट ) रोजी सकाळी ट्विट करून छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात होणार, अशी घोषणा केली आहे. ९ ऑगस्ट रोजी असणाऱ्या क्रांती दिना दिवशी तुळजापूर येथे भेटू, असेही त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मोठा वादंग निर्माण होऊन तुळजापूर शहर बंद देखील ठेवण्यात आले होते. या प्रकारामुळे जनभावना दुखावली गेली होती. यानंतर संभाजीराजे हे प्रथमच तुळजापूरला येत असून या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी क्रांती दिनी तुळजापूर येथून परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार असल्याचे ट्विट केल्याने राज्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.
संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून तुळजापूर येथे नेमके काय केले जाणार आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता ही छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी वरदायिनी आहे. छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य जेव्हा तुळजाई नगरीतील तुळजाभवानी मातेच्या दर्शनास येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतात. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. सरकारी नियम दाखवत महाराजांना जाण्यापासून रोखण्यात आले. राजेंनी आपल्या घराण्याची परंपरा आपल्याला पाळू द्या, अशी विनंती करूनही त्यांना आतमध्ये प्रवेश दिला गेला नाही.