श्रीहरीकोटा : भारताने चंद्रावर पोहोचण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. भारताची तिसरी चांद्रयान मोहिम श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आली. काउंटडाऊननंतर चांद्रयान-३ रॉकेट यशस्वीपणे प्रक्षेपित झाले आहे. त्यानंतर भारत आता जगात एक मोठा विक्रम करण्याच्या अगदी जवळ आहे. ४० दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर चांद्रयान-३ चे रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.
पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 3.84 लाख किलोमीटर आहे. चांद्रयान-3 चा चंद्रावर पोहोचण्याची संभाव्य तारीख 23 ऑगस्ट आहे. म्हणजेच चांद्रयान-3 चा चंद्रावरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी 40 दिवस लागतील. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे सॉफ्ट लँडिंग हे या मोहिमेचे पहिले लक्ष्य आहे. हा देखील मिशनचा सर्वात गुंतागुंतीचा भाग आहे. दुसरे लक्ष्य म्हणजे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालणे आणि तिसरे लक्ष्य रोव्हरकडून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे चंद्राची रहस्ये उलगडणे.
दरम्यान, 'चांद्रयान-3' ही 2019 च्या 'चांद्रयान-2' चा फॉलोअप मिशन आहे. भारताच्या या तिसर्या चांद्रयान मोहिमेतही अवकाश शास्त्रज्ञांनी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडरचे 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 'चांद्रयान-2' मोहिमेदरम्यान, शेवटच्या क्षणी लँडर 'विक्रम' मार्गाच्या विचलनामुळे 'सॉफ्ट लँडिंग' करू शकले नाही. क्रॅश लँडिंगमुळे ही मोहीम यशस्वी होऊ शकली नाही.