राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. या जाहीरनाम्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने "शपथनामा" नावाने लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे. २६ एप्रिल १६४५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पूर्ण केली. आणि शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात? शपथेला नाही, खंजीराला महत्व आहे !!१९७७ मध्ये आणीबाणी नंतर काँग्रेस पक्ष फुटला. इंदिरा गांधी यांची साथ सोडून शरद पवार ब्रह्मानंद रेड्डी यांच्या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले. १९७८ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादांचे सरकार पाडले.
तसेच ते पुढे म्हणाले की, १९८० मध्ये ४० आमदारांसह बंडखोरी करत पुलोद सरकार स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९८८ मध्ये शरद पवार पुलोदमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. १९९९ मध्ये काँग्रेसमधून पुन्हा बाहेर, राष्ट्रवादीची स्थापना केली. २०१९ मध्ये अजितदादांना शब्द दिला आणि फिरवला! २०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली. खरंच सांगा, शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.