भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणे पुढे येत असल्याने सेंट्रल रेल्वेला करप्शन रेल्वेही म्हटले जात आहे. आतापर्यंत सीबीआयने सेंट्रल रेल्वेत भ्रष्टाचाराची तीन प्रकरणे दाखल केली आहेत. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी खासगी कंपनीला बेकायदेशीरपणे फायदा करुन दिल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती.
सुमारे २२.६० कोटी रुपयांचा हा गैरव्यवहार असल्याचे सांगितले जाते. यावेळी १२ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ विभागीय इलेक्ट्रीकल इंजिनिअर आणि इतर ७ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. १ एप्रिल २०२२ रोजी सेंट्रल रेल्वेच्या नागपूर येथील सहायक विभागीय अभियंत्याला १.८० लाखांची लाच घेताना सीबीआयने अटक केली होती.
तसेच छाप्यादरम्यान ६०.६२ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. २७ सप्टेंबर २०२२ रोजी सीबीआयने सेंट्रल रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्रिन्सिपल चिफ मेकॅनिकल इंजिनिअर यांच्यासह दोघांना १ लाखाची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली होती. या दरम्यान सीबीआयने टाकलेल्या छाप्यात २३ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती.