नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने तोंडी समन्स पाठवले आहे. त्यांना 27 आणि 28 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सीबीआयने सांगितले आहे. याबाबत सीबीआयने अद्याप दुजोरा दिलेला नाही. याप्रकरणी सत्यपाल मलिक यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे.
सत्यपाल मलिक म्हणाले की, सीबीआयला काही स्पष्टीकरण हवे आहेत, त्यासाठी माझी उपस्थिती हवी आहे. मी राजस्थानला जात आहे, म्हणून त्यांना 27 ते 29 एप्रिलची तारीख दिली आहे. जेव्हा मी उपलब्ध असतो. त्यांनी ट्विट करून लिहिले की, मी सत्य बोलून काही लोकांची पापे उघड केली आहेत. कदाचित म्हणूनच कॉल आला असेल. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी घाबरणार नाही. मी सत्याच्या पाठीशी उभा आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, सत्यपाल मलिक यांनी नुकतेच पुलवामा हल्ल्याबाबत गौप्यस्फोट केला होती. पुलवामामधील तो रस्ता प्रवासासाठी धोकादायक होता. सहसा त्या रस्त्याने सुरक्षाकर्मी प्रवास करीत नाहीत. त्यामुळे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाण्यासाठी विमानाची मागणी केली होती, पण गृह मंत्रालयाने ही मागणी फेटाळली. जवानांना नेण्याच्या मार्गावरही पुरेशी सुरक्षा तपासणी झाली नव्हती. त्याच रस्त्यावर आतंकी हल्ला होऊन 40 जवानांचे बलिदान झाले, असा दावा मलिक यांनी एका मुलाखतीत केला होता. यावरुन राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
काय आहे प्रकरण?
सीबीआयने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी समूह वैद्यकीय विमा योजनेचे कंत्राट देण्यात आणि जम्मू-काश्मीरमधील 2,200 कोटी रुपयांच्या किरू जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मलिक यांच्याविरोधात दोन एफआयआर नोंदवले आहेत. अलीकडेच सत्यपाल मलिक यांनी दोन फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्याला ३०० कोटींची ऑफर मिळाल्याचा दावा केला होता. सीबीआयने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही त्याची चौकशी केली होती.