दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची आज CBI चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी चौकशीसाठी बोलावले आहे. दिल्ली सरकारतर्फे अबकारी धोरणाच्या अंमलबजावणीत कथित भ्रष्टाचारप्रकरणी ही चौकशी होणार आहे. मनिष सिसोदिया यांच्या घराजवळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमण्याची शक्यता आहे. यामुळे घराजवळील परिसरात कलम 144 लागू करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे.
‘सीबीआय’ने या प्रकरणी ‘इंडो स्पिरिट’चे मालक समीर महेंद्रू, गुरुग्राममधील ‘बडी रिटेल प्रायव्हेट लिमिटेड’चे संचालक अमित अरोरा व ‘इंडिया अहेड न्यूज’चे व्यवस्थापकीय संचालक गौतम मुथांसह अनेकांची चौकशी केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले. एजन्सीने ‘आप’चे कार्यकर्ते आणि मनोरंजन आणि ‘इव्हेंट’ कंपनी ‘ओन्ली मच लाउडर’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नायर आणि हैदराबादस्थित व्यापारी अभिषेक बोईनपल्ली यांना अटक केली आहे. त्यांचे भागीदार अरुण पिल्लई यांचेही ‘सीबीआय’च्या आरोपपत्रात नाव आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, मनिष सिसोदिया यांच्या घरी छापे टाकण्यात आले. परंतु त्यांच्या घरी, बँक लॉकरमध्ये काही मिळाले नाही. गुजरात प्रचाराला जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांना अटक करत आहे. परंतु गुजरातचा प्रचार थांबणार नाही. कारण गुजरातचा प्रत्येक व्यक्ती 'AAP'चा प्रचार करत आहे.
माझ्या विरोधात कटकारस्थान रचण्यात आले आहे. खोटी केस दाखल करत मला अटक करण्याची तयारी सुरू केली आहे. मी काही दिवसात प्रचारासाठी गुजरातला जाणार होतो. मला गुजरातला जाण्यापासून रोखण्यासाठी हा कट रचला आहे. परंतु मला अटक केल्याने गुजरातचा प्रचार थांबणार नाही. गुजराती मतदार जागा झाला आहे. चांगल्या शाळा, रुग्णालये, नोकरी, वीज या सोयींसाठी गुजरातमधील लहान मुले देखील प्रचार करत आहेत. गुजरातची निवडणूर यावेळी एक आंदोलन असणार आहे. माझ्या घरी छापे टाकले, बँक लॉकर पाहिले, माझ्या गावी गेले परंतु त्यांना काहीच मिळाले नाही. असे मनिष सिसोदिया यांनी ट्विट करुन सांगितले.