"एखादी अतिरेक संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही..", हा इशारा पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. पोलीस आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावून पुणे शहरातील एका नामांकित हॉटेल व्यवस्थापनाला धोक्याचा इशारा दिला आहे.
कल्याणी नगर परिसरात असलेल्या या नामांकित हॉटेलला पोलिसांकडून अनेकदा आवाज मर्यादित ठेवण्याबाबत अनेकदा नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. हॉटेल उशिरापर्यंत चालू ठेवत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. या हॉटेल व्यवस्थापनाकडून अनेकदा डिस्कोथेक परवान्यातील अटी शर्तीचा भंग करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी वेळोवेळी कारवाया केल्या असूनही संबंधित हॉटेल व्यवस्थापनाकडून याकडे हेतू पुरस्कर कानाडळा केला जात असल्याचा आरोप या कारणे दाखवा नोटीस पत्रातून करण्यात आला आहे.
दरम्यान या हॉटेलमध्ये मोठ्या संख्येने गर्दी होत असल्याने आग, चेंगराचेंगरी, गॅस गळती, अफवा यासारखी घटना घडून जीवितहानी होऊ शकते. तसेच सध्या अतिरेकी कारवायाबाबत अलर्ट आहे. त्यामुळे एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या हॉटेलचा डिस्कोथेक परवाना रद्द का करण्यात येऊ नये असे या नोटीसीद्वारे विचारले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सहीने ही कारणे दाखवा नोटीस असल्याने एकच खळबळ उडाली आहे.