सचिन अंकुलगे, लातूर
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केलं आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, आंदोलन काळातील आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच उपोषण सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आणि मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज लातूर जिल्हा बंदची हाक मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.
काल लातूर शहरात झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर जिल्हा बंदचा निर्णय घेण्यात आला होता. लातूर शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, व्यापारी संस्था , एसटी महामंडळ , सरकारी आस्थापना बंद ठेऊन पाठिंबा द्यावा.
तसेच शांततेच्या मार्गानेच बंद पाळण्याचं आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते. आज लातूर शहरासह जिल्ह्यातील मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे.