सातारा तालुक्यातील जाधववाडी-तासगाव येथील भारतीय सैन्य दलातील 31 वर्षीय वीर जवान समाधान मानाजी मोहिते यांचे शुक्रवारी अपघाती निधन झाले. चुलत बहिणीची लग्नपत्रिका वाटण्यासाठी म्हसवड मार्गे येत असताना पावसात पांढरवाडी गावानजीक त्यांची गाडी स्लिप झाली. या घटनेत त्यांचा जागीच मुत्यू झाला. अपघाताची बातमी जाधववाडी ग्रामस्थांना समजताच गावावर शोककळा पसरली आहे.
समाधान मोहिते हे 2011 साली बीएसएफ मध्ये भरती झाले होते. सध्या त्यांची पोस्टींग जम्मू याठिकाणी होती. मागील आठवड्यात ते गावी सुट्टीवर आले होते. घटनेनंतर आज दुपारी त्यांचं पार्थिव गावी आणल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश ह्दय पिळवटून टाकणारा होता. समाधान मोहिते यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली.
"भारत माता की जय, वन्दे मातरम" या जय घोषाने सारा परिसर दुमदुमून गेला होता. लष्करी जवानांच्या वतीने हवेत बंदूकीच्या फैरी झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली. जाधववाडी ग्रामस्थांसह परिसरातील हजारों नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी उपस्थिती लावत आपल्या लाडक्या जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला. समाधान यांच्या अचानक जाण्याने जाधववाडी गावावर शोककळा पसरलीये. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी मोठा भाऊ, दोन लहान मुलं असा परिवार आहे.