एप्रिल महिन्यात अनेक ठिकाणी तापमानाच्या पारा 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच यंदाचा एप्रिल महिना देशातील उकाड्याचे सर्व विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. साधारणपणे मे महिन्याच्या मध्यानंतर जेवढं तापमान असतं तेवढं तापमान एप्रिल महिन्यात वाढलं आहे.
2 मे पर्यंत पूर्व, मध्य आणि वायव्य भारतात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, पश्चिम बंगाल, ओदिशा, छत्तीसगड आणि गुजरातमध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट राहिल. हवामान विभागाने पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उर्वरित वायव्य भारत आणि मध्य भारतासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे मुंबईचं वातावरण आणखीच बिकट झालं आहे. मुंबईत गुरुवारी (28 एप्रिल) सलग दुसऱ्या दिवशीही पारा 37 अंश सेल्सिअस एवढा राहिला. पुढील काही दिवस मुंबईत पारा 37 किंवा त्याहून अधिक राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.