चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घराजवळ सोमवारी जिवंत बॉम्बचा शेल सापडला. हा जिवंत बॉम्ब शेल चंदीगडमधील कंसल येथील बागेत सापडला होता. यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे.
हा जिवंत बॉम्ब शेल पंजाब आणि चंदीगडच्या सीमेवर सापडला असून तो जप्त करण्यात आला आहे. तिथे पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे हेलिपॅड आहे. यासोबतच हरियाणा आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे. या प्रकरणावर पोलिसांनी म्हंटले की, हा मिसफायर केलेला बॉम्ब शेल असल्याचे दिसते. यामध्ये कोणताही धोका नाही. हा बॉम्ब शेल आजूबाजूच्या भंगारच्या दुकानातून आला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. चंदीगड पोलिसांनी याप्रकरणाची लष्कराला माहिती दिली आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चंदीगडमधील सेक्टर 2 मधील कोठीपासून थोड्या अंतरावर असलेल्या राजिंद्र पार्कजवळ एका प्रवाशाने बॉम्बचा शेल पाहिला. त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. तेथे उपस्थित जवानांनी तत्काळ शेलभोवती वाळूच्या गोण्या टाकल्या आहेत आणि बॉम्ब निकामी पथकाला पाचारण केले. यासोबतच तेथे सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली होती.