एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती मिळत आहे. ही धमकी मेलद्वारे मिळाली असल्याचे, सूत्रांनी सांगितलं आहे. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 बॉम्बने उडवण्याची धमकी या मेलद्वारे देण्यात आली आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) टर्मिनल 2 वर गुरुवारी बॉम्बनं उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला आणि एअरपोर्ट प्रशासनाची झोप उडाली. सूत्रांनी सांगितलं की, हा धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीनं हा स्फोट टाळण्यासाठी 48 तासांच्या आत एक दशलक्ष डॉलर्स भरण्याची मागणी केली आहे, तेही बिटकॉइनमध्ये. सहारा पोलिसांनी या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं quaidacasrol@gmail.com हा ईमेल आयडी वापरुन धमकीचा ईमेल पाठवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं गुरुवारी सकाळी 11 वाजून 6 मिनिटांनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) च्या फीडबॅक इनबॉक्समध्ये हा ईमेल पाठवला होता. या प्रकरणी सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध धमकावणे आणि खंडणी मागितल्याप्रकरणी आयपीसीच्या कलम 385 , 505 (1) (बी) अन्वये एफआयआर नोंदवला आहे. सूत्रांनी सांगितले की, ज्या आयपी अॅड्रेसचा वापर करून हा धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता त्याचा शोध पोलीस घेत आहेत.